बंगालच्या उपसागरात कमी दाब, पुन्हा वातावरण बिघडनार… तोडकर हवामान अंदाज
तोडकर हवामान अंदाज: बंगालच्या उपसागरामध्ये सध्या एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, परंतु त्याची तीव्रता कमी असल्याने त्याचा मोठा धोका महाराष्ट्रावर नाही. या सिस्टीमचा सर्वाधिक प्रभाव दक्षिण भारतातील राज्यांवर, जसे की कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ या भागांवर राहील. त्यामुळे महाराष्ट्रातील सोलापूर, करमाळा, लातूर आणि पुणे जिल्ह्यातील दक्षिण भाग यांसारख्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये बाष्पयुक्त वातावरणामुळे थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल.
उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर खानदेश या भागांना कोणताही धोका नाही, तर नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या विदर्भातील भागातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात कुठेही जोरदार पावसाची शक्यता नाही. (तोडकर हवामान अंदाज)
सध्याची थंडीची लाट चांगली असून, येत्या आठवड्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. मात्र, १८० वर्षांतील विक्रमी थंडी पडेल याला आधार नाही. शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की, जास्त थंडी पिकांसाठी हानिकारक ठरू शकते. विशेषतः ज्वारीसारख्या पिकांना किंवा फुलकोबी आणि पालेभाज्यांवर दवबिंदू (वदाळ) वाढून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे फुलांना व वाढीला बाधा येऊ शकते. त्यामुळे पिक संरक्षणाच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, पुढील एक सव्वा महिना महाराष्ट्राकडे मोठा पाऊस येण्याची शक्यता नाही. यामुळे पेरणी झालेल्या पिकांवर दुबार पेरणीचे संकट येणार नाही, कारण पीक आता मोठ्या अवस्थेत जाईल. भविष्यातील हवामानाचा विचार केल्यास, जानेवारीच्या अखेरीस आणि फेब्रुवारी महिन्यात राज्यात काही ठिकाणी गारपिटीचा धोका दर्शवणारी सिस्टीम सक्रिय होण्याची शक्यता मॉडेलमध्ये व्यक्त होत आहे.
मात्र, सध्या या गारपिटीचा नेमका ट्रॅक किंवा कोणत्या जिल्ह्यांवर परिणाम होईल हे निश्चित सांगता येत नाही, आणि मॉडेलनुसार धोक्याची टक्केवारीही कमी आहे. त्यामुळे हा व्यवसाय जोखमीचा आहे हे लक्षात घेऊन, शेतकऱ्यांनी आपले पीक नियोजन (उदा. टरबूज लागवड) थांबवू नये आणि आत्मविश्वासाने शेतीची कामे सुरू ठेवावीत असेही तोडकर म्हनाले.