Crop insurance ; पिकविम्याचा लाभ घेण्यासाठी ही शेवटची मुदत
Crop insurance ; रब्बी हंगाम २०२५-२६ मधील पीकविमा योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर, गहू, हरभरा व कांदा पिकासाठी १५ डिसेंबर व उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत सहभागी होता येणार आहे, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी दिली.
नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. विभागातील पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी- फार्मर आयडी, आधार कार्ड,बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार आदी कागदपत्रे आवश्यक असून ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे. https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून पीकविमा योजनेस सहभाग घेता येईल.विमा अर्ज भरण्यासाठी सीएससी केंद्र चालकास शासनाने निर्धारित केलेले प्रति शेतकरी ४० रुपये मानधन संबंधित विमा कंपनीमार्फत दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा हप्त्याव्यतिरिक्त इतर शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही.
एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना पुढील पाच वर्षे काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. रब्बी कांद्यासाठी तिन्ही जिल्ह्यांसाठी विमा संरक्षित रक्कम ९० हजार रुपये तर विमा हप्ता अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यासाठी ९०० रुपये, सोलापूर जिल्ह्यासाठी ४५० रुपये राहील. उन्हाळी भुईमुगासाठी तिन्ही जिल्ह्यांसाठी विमा संरक्षित रक्कम ४० हजार ६०० व विमा हप्ता १०१ रुपये ५० पैसे विमा हप्ता राहील.
येथे करा संपर्क हेल्पलाइन
अधिक माहितीसाठी १४४४७ या हेल्पलाइन क्रमांकावर अथवा भारतीय कृषी विमा कंपनी, स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. शेतकऱ्यांनी विहित मुदतीमध्ये योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. गावसाने यांनी केले आहे.
जिल्हानिहाय विमा संरक्षित रक्कम
अहिल्यानगर – गहू (बागायती)- विमा संरक्षित रक्कम ४५ हजार रुपये (विमा हप्ता ४५० रुपये), रब्बी ज्वारी बागायती व जिरायती, हरभरा- ३६ हजार रुपये (३६० रुपये),
पुणे – गहू (बागायती)- ४५ हजार रुपये (२२५ रुपये), रब्बी ज्वारी बागायती व जिरायती- ३६ हजार रुपये (१८० रुपये), हरभरा- ३६ हजार रुपये (९० रुपये)
सोलापूर – गहू (बागायती)- विमा संरक्षित रक्कम ३८ हजार रुपये (विमा हप्ता ३८० रुपये), रब्बी ज्वारी बागायती – ३६ हजार रुपये (३६० रुपये), रब्बी ज्वारी जिरायती- ३० हजार रुपये (३०० रुपये), हरभरा- ३२ हजार ६७५ रुपये (३२६ रुपये)













